गाव पुढाऱ्यानं ढापलं उंबरे पागे येथील  चार एकर गावठाण जमीन !प्रहारच्या उपोषणाच्या  दणक्याने चौकशी सुरु .. पंढरपूरच्या गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी  धास्ती घेत केली त्या जमिनीवर जाऊन प्रत्यक्षात पाहणी.

गाव पुढाऱ्यानं ढापलं उंबरे पागे येथील  चार एकर गावठाण  जमीन !प्रहारच्या उपोषणाच्या  दणक्याने चौकशी सुरु  ..   पंढरपूरच्या गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी  धास्ती घेत केली त्या जमिनीवर जाऊन प्रत्यक्षात पाहणी.

पंढरपूर (प्रतिनिधी)

 ग्रामपंचायतीमधील सत्तेचा वापर करून गावातील चार एकर गायरान, पुढाऱ्यानं हडपल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे . पंढरपूर तालुक्यातील उंबरे (पागे) येथे घडलेल्या या प्रकारास प्रहार संघटनेने वाचा फोडली आहे. येथील ग्रामस्थांना घेऊन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन आरंभताच या प्रकाराची चौकशीही सुरू झाली असल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. 


पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी उंबरे (पागे ) येथे घडलेल्या या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे गावोगावच्या गायरान जमिनी हडप केलेल्या पुढाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.  उंबरे (पागे) येथील गावपुढारी शहाजी माणिक मुळे यांनी येथील ४ एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. प्रहार संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष नानासो इंगळे तसेच बापूराव मोहिते यांनी या प्रकरणी आवाज उठविला होता. या गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित पुढार्‍याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती, परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई होत नव्हती. यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.


 सोमवार दि. २२ जून रोजी प्रहार संघटनेसह ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती समोर धरणे आंदोलन उभे केले होते. हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला होता. या आंदोलनाची  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी तात्काळ दखल घेतली आणि चौकशी सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. एवढ्यावरच न थांबता, चौकशीसाठी याच दिवशी उंबरे गाव गाठले आहे. संबंधित उपोषणकर्त्यांना याबाबतचे लेखी पत्रही आंदोलनाच्या ठिकाणी देण्यात आले आहे. येत्या १० जुलैपर्यंत हे अतिक्रमण काढून , संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये देण्यात आले आहे. यावेळी प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेचे आंदोलनकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले , याचवेळी लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास, याहून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही संबंधित आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनकर्त्यांमध्ये प्रहार संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष नानासो इंगळे, बापूराव मारुती मोहिते, यांचेसह गणेश भिवा ढोबळे, इब्राहिम मुलाणी , विठ्ठल कानगुडे , चंकेश्वर काळे  तसेच हसीना काळे या महिला भगिनीचा समावेश होता.
 

चौकट

प्रहार संघटना आणि उंबरे (पागे) येथील ग्रामस्थांनी पंढरपूर पंचायत समितीसमोर केलेल्या धरणे आंदोलनामुळे, येथील खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील गाव पुढारी शहाजी माणिक मुळे यांनी चार एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचा प्रकार उघड झाला आहे. हे अतिक्रमण ठराविक काळात काढण्याचे लेखी आश्वासन येथील गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. अशी अनेक प्रकरणे पंढरपूर तालुक्यात आहेत. उंबरे येथील हे अतिक्रमण गटविकास अधिकार्‍यांकडून काढले गेल्यास , नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास नक्कीच वाढणार आहे.